दारूला पैसे न दिल्याने मजुराला फायटरने मारहाण

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : दारूसाठी पैसे न दिल्याने एका मजुराला शिवीगाळ करत लोखंडी फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना 31 जानेवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नवनाथनगर परिसरात घडली. आयुब बशीर शेख ऊर्फ सोनू (रा. नवनाथनगर) असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याच्याविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघपाल जगन जावळे (33, रा. नवनाथनगर, पुंडलिकनगर) यांनी फिर्याद दिली. 31 रोजी रात्री नवनाथ मंदिराजवळ आरोपी आयुब बशीर शेख याने दारू पिण्यासाठी संघपालला पैशाची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून संघपालला खाली पाडून लोखंडी फायटरने तोंडावर व नाकाच्या वरच्या भागावर वार केले. त्यामुळे संघपाल जावळे जखमी झाले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार राठोड तपास करीत आहेत.